मुंबई : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, त्यातच ठाकरे बंधूंच्या युतीबाबत एक मोठी आणि निर्णायक बातमी समोर आली आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकनंतर आता विदर्भातील आणखी चार महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या चारही महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे आता शिवसेना–मनसेची युती एकूण आठ जिल्ह्यांतील महापालिकांमध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
विदर्भातही 'ठाकरे ब्रँड' एकत्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी याबाबत ‘एबीपी माझा’शी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. विदर्भातील चारही महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “विदर्भात ठाकरे ब्रँड एकत्र येत असून, याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसेल. आम्हाला मोठे यश मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विदर्भात मनसे–शिवसेना युतीची तयारी अंतिम टप्प्यात
राजू उंबरकर हे आज अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. याच बैठकीत अकोला महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. यावरून विदर्भात मनसे–शिवसेना युतीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट होते.
ठाकरे बंधूंची युती किती मोठा धमाका करणार?
मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये आधीच ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यात आता विदर्भातील चार महापालिकांची भर पडल्याने राज्याच्या राजकारणात ‘ठाकरे ब्रँड’ पुन्हा एकदा प्रभावीपणे उभा राहत असल्याचे चित्र आहे. विशेषतः विदर्भात भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूरसारख्या शहरात ही युती किती प्रभाव टाकते? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना–मनसे युतीचा विस्तार हा राज्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरू शकतो. येत्या काही दिवसांत जागावाटप, प्रचाराची दिशा आणि संयुक्त रणनीती यावर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, ठाकरे बंधूंची ही युती निवडणूक रणधुमाळीत किती मोठा धमाका करते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.